यीस्ट म्हणजे काय ?
यीस्ट हा एक एकल पेशीचा सूक्ष्मजीव (बुरशी) आहे. काही सूक्ष्मजीव मानवासाठी अपायकारक नसतात. किंबहुना ते आपल्या शरीरातील अनेक प्रक्रियांना मदतच करत असतात. यीस्ट मध्ये दोन जाती आहेत एक आहे बेकर्स यीस्ट आणि दुसरे बृव्हर्स यीस्ट.
बेकर्स यीस्ट
हि जात कणकेतील साखरेवर किण्वन प्रक्रिया (फरमेंटेशन) करून त्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू आणि इथेनॉल बनवते. ह्या वायूमुळे ब्रेड/पाव/इतर बेकरी पदार्थ फुलतात आणि सच्छिद्र होतात. साखर हे यीस्ट चे अन्न आहे. खूप साखर वापरल्यास यीस्ट शुष्क होते आणि त्याचा वेग मंदावतो. मीठाने यीस्ट किण्वन प्रक्रियेचा वेग मंदावतो. बटर आणि अंडी सुद्धा यीस्ट ची कार्यप्रवणता कमी करतात.
बेकिंग पावडर आणि यीस्ट मध्ये काय फरक आहे?
दोघांचेही कार्य सारखेच (कार्बन डायऑक्साईड वायूतयार करून त्याचा उपयोग पदार्थ सच्छिद्र आणि फुलवण्यासाठी करणे) फक्त उगम वेगळा. बेकिंग पावडरचा उगम रासायनिक प्रक्रियेतून होतो आणि यीस्ट चा जैविक प्रक्रियेतून.
दही दुधाच्या किण्वन प्रक्रियेने (फरमेंटेशन) बनत. यात बॅक्टेरिया मुख्यतः प्रमुख भूमिका बजावतात. दही/ताक थोडे आंबट झाले की त्यात यीस्ट बनते
घरच्या घरी यीस्ट कसे बनवाल?
साहित्य
- १ कप मैदा
- ३ टीस्पून प्लेन दही
- २ टीस्पून साखर
- १ टीस्पून मध
- पाऊण ग्लास कोमट पाणी
कृती
- कोमट पाण्यात साखर घाला थोडा वेळ ठेवून द्या म्हणजे साखर मिक्स होईल
- यात मध घाला आणि छान मिक्स करा
- एका बाउल मध्ये मैदा घ्या
यात हळूहळू मध – साखरेचे पाणी घाला आणि छान मिक्स करून घ्या - आता यात दही (सामान्य तापमानाला दही पाहिजे) घाला आणि मिक्स करा
- आता झाकण ठेवून थोड्या गरम असलेल्या जागी १५-१६ तास ठेवून द्या
- वरील वेळेनंतर झाकण काढून बघा. वरती छान फेस आलेला असेल
तुमचे यीस्ट तयार आहे - याला तुम्ही ३-४ दिवस वापरू शकता
- स्टोर करताना फ्रिज मध्ये ठेवा
- प्रमाण: १ कप मैद्यासाठी पाव कप यीस्ट वापरा