उन्हाळयात आंबा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. कधी कधी जास्त प्रमाणात आंबा आणला जातो किंवा आणलेला आंबा एकदम पिकल्यामुळे तो संपणार कसा हा प्रश्न पडतो. त्यावेळी आपण आंब्याचे आंबा पल्प किंवा आंबा पोळी करतो. परंतु आज शिकणार आहोत एक नवीन रेसिपी ती म्हणजे आंबा कुकीज कसे बनवायचे ते.
वस्तू
- कुकी कटर / चाकू
- ओव्हन
- पोळपाट लाटणे
- बेकिंग ट्रे (नसल्यास कुठलेही अलुमिनियमचे झाकण वापरा)
साहित्य
- १ वाटी आंब्याचा आटवलेला रस
- २ वाट्या कणीक (मैदा/आटा)
- ५ टेबलस्पून साखर
- १ वाटी लोणी / मार्गारीन
- अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर
- चिमूटभर दालचिनी पूड
- दूध
कृती
- कणिक घेऊन त्यात लोणी/ मार्गारीन, साखर घाला आणि चांगले मिसळून घ्या
- आंब्याच्या रसाच्या गुठळ्या मोडून हा रस गॅस वर आटवा. आटवताना सतत घुसळा जेणेकरून तो खाली लागणार नाही. चांगला घट्ट झालेला रस पुढे वापरा.
- आटवलेल्या रसात थोडे थोडे दूध घालून चांगला चिकट होईपर्यंत मिसळून घ्या. रस पातळ राहायला नको
- रसाचे चिकट मिश्रण अधिक बेकिंग पावडर व दालचिनी पूड कणकेत घालून चांगले एकत्र करा आणि लाटता येईल असा कणकेचा गोळा मळून तयार करा. कोरडा झाल्यास दूध वापरून पुन्हा मळून घ्या
- ओव्हन १८० डिग्रीला १० मिनिट प्रीहीट करून घ्या
- कणकेची जाड पोळी लाटून घ्या. जाडी साधारण १ कमी पेक्षा थोडी कमी पाहिजे
- नंतर कुकी कटरने किंवा चाकूने हव्या त्या आकाराच्या कुकीज कापून घ्या
- बेकिंग ट्रे वर कुकीज मांडून प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये (कॉन्व्हेक्शन मोड) ला २० ते २५ मिनिटे बेक करा
- साधारणतः ऋतूनुसार बेकिंगचा कालावधी कमी जास्त असू शकतो त्यामुळे १५ -२० मिनिटानंतर एकदा ओव्हन उघडून आपण कुकीज बेक झाल्यात का ते बघू शकता. छान खरपूस कुकीज दिसल्यावर ओव्हन बंद करावा
- आता मस्त छान भाजलेल्या खरपूस कुकीज सर्व कराव्यात
– हर्षाली